कुकडी सहकारी साखर कारखान्याबाबत नेवास्यात ऊस दरावरून आंदोलन पेटलं; 600 रुपयांसाठी शेतकऱ्याचं उपोषण, राजकीय ‘तू तू, मै मै’नंतर लेखी आश्वासनावर समाप्त
नेवासा( प्रतिनिधी.)नेवासा तालुक्यातील शेतकरी नागवडे यांनी उसाला ठरलेला 2800 रुपयांचा दर पूर्ण मिळावा, या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषण सुरू केले होते. प्रत्यक्षात शेतकऱ्याला फक्त 2200 रुपये प्रतिटन दराने पैसे देण्यात आले, त्यामुळे उर्वरित 600 रुपये मिळावेत, या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
हा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित राहिल्यानंतर आणि प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर शेतकऱ्याने उपोषण सुरू करून आंदोलन छेडले. तब्बल सहा दिवसांनी, म्हणजे 20 ऑगस्ट रोजी, नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे, बसपाचे प्रभारी हरीशदादा चक्रनारायण, आवताडे आणि अहिल्यानगरचे सहसंचालक गोंद साहेब शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव काळे, जिल्हा उपाध्यक्ष तुवर, नेवासाचे तहसीलदार संजय बिराजदार हे उपोषणस्थळी आले यावेळी अनेक राजकीय नौटंकीबाजी पाहण्याचा अनुभव नेवासकर व शेतकऱ्यांना आला.
या चर्चेदरम्यान एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार समोर आला. आवताडे आणि बसपाचे प्रभारी हरीशदादा चक्रनारायण यांच्यात शाब्दिक चकमक झाली. चक्रनारायण यांनी आक्षेप घेतला की, "शेतकरी सहा दिवस उपोषणावर बसलेला असताना तुमचं लक्षच नव्हतं. आता सहसंचालकांसोबत येऊन कोणताही ठोस निर्णय न घेता उपोषण मागे घ्यायला सांगता?"
यावेळी त्यांनी आरोप केला की, प्रादेशिक सहसंचालक गोंद साहेब यांना उपोषणाची सर्व माहिती दिली होती, तरीही त्यांनी वरिष्ठ सहकार आयुक्तांपर्यंत ती पोहोचवली नाही. आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली तेव्हा त्यांनी उलट सहकार आयुक्तांनी विचारल्यावर सांगितले की, "मला काय स्वप्न पडलं आहे का, की नेवासात उपोषण सुरू आहे?" – असा परखड सवाल केला.
चर्चेदरम्यान कुकडी कारखान्याच्या संचालक मंडळाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नाही, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
दीर्घ वाद, चर्चासत्र आणि राजकीय टोलेबाजी यानंतर लेखी आश्वासनानंतर अखेर शेतकऱ्याला 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान उर्वरित 600 रुपये अदा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण ज्यूस व पाणी पाजून स्थगित करण्यात आले.