प्रायमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात – आता मोठ्या आजारांवर मोफत उपचार नेवासा फाट्यावरच!
नेवासा तालुक्यातील रुग्णांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, आता मोठ्या शस्त्रक्रिया किंवा खर्चिक उपचारांसाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि तज्ञ डॉक्टरांच्या टीमसह कार्यरत होणारे प्रायमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नेवासा फाटा येथे राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब आणि गरजू कुटुंबांना ५०० हून अधिक शस्त्रक्रिया व आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेत रुग्णांसाठी औषधे, तपासण्या, अॅडमिशन, ऑपरेशन आणि हॉस्पिटलायझेशन पूर्णतः मोफत दिले जाते.
या योजनेचा शुभारंभ आणि हॉस्पिटलच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा गुरुवार, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता नेवासा फाटा येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. विठ्ठलराव लंघे पाटील असतील. या कार्यक्रमाला प्रायमस हॉस्पिटलचे संस्थापक मा. विलासराव लोखंडे पाटील, तज्ञ डॉक्टरांची टीम, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
प्रायमस हॉस्पिटलमध्ये सुरू होणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गरजूंना त्यांच्या गावातच अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळवून देणारी एक मोठी सुविधा ठरणार आहे. गरजू नागरिकांनी योजना कार्डसह प्रायमस हॉस्पिटलमध्ये थेट संपर्क साधून उपचार घेता येणार आहेत. हा लोकार्पण सोहळा नेवासा तालुक्याच्या आरोग्यविकासाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
तरी या लोकार्पण सोहळ्यास नेवासा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रायमस हॉस्पिटल, नेवासा फाटा यांच्या वतीने करण्यात आले आहे.