**राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकर्ता संवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
मा.श्री. शिवाजीराव साळवे यांचा कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश
अहिल्यानगर | प्रतिनिधी
रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने हॉटेल पॅराडाईज, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद अभियान व समाज भूषण मा. श्री. शिवाजीराव साळवे (संस्थापक अध्यक्ष, चर्मकार संघर्ष समिती) यांच्या महासंघात जाहीर प्रवेश सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्यात मा. शिवाजीराव साळवे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघात प्रवेश करून, समाजहितासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. त्यांनी आपल्या भाषणात चर्मकार समाजासमोरील प्रमुख प्रश्न, सामाजिक विषमता, शिक्षणातील दुर्लक्षितता, बेरोजगारी आणि चर्मोद्योगाचा पुनर्विकास या विषयांवर ठाम भूमिका मांडली. “संघटित झाल्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही. सामाजिक समतेसाठी आणि हक्काच्या न्यायासाठी लढा देणे काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री मा. बबनराव घोलप (नाना) होते. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संघटनेच्या भुमिकेचे महत्त्व पटवून दिले व समाजातील युवकांनी नेतृत्व उचलून धरावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. मा. ज्ञानेश्वरजी कांबळे (अध्यक्ष, चर्मोद्योग विकास महामंडळ), मा. दिलीप भाऊ कानडे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), सौ. शोभाताई कानडे (महिला राज्य उपाध्यक्ष), मा. बाळासाहेब केदारे (जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर), मा. माधवराव गायकवाड (प्रदेशाध्यक्ष), मा. अनिल भाऊ कानडे (राज्य सचिव), मा. कैलासराव गांगर्डे (राज्य कार्यकारिणी सदस्य), मा. डॉ. शांताराम कारंडे (प्रदेशाध्यक्ष), मा. राजेंद्र बुंदेले (राज्य उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक), मा. चंद्रकांत नेटके (राज्य संघटक), मा. माणिकराव नवसुपे (सामाजिक कार्यकर्ते), श्रीमती लताताई नेटके (महिला जिल्हाध्यक्ष), मा. माधव भाऊ नन्नवरे (माजी जिल्हा संपर्कप्रमुख), मा. रवी भाऊ सपकाळ (नेवासा तालुका उपाध्यक्ष, रा. माळीचिंचोरा) व मा. बन्सी भाऊ एडके (माजी जिल्हा उपाध्यक्ष) या सर्व मान्यवरांनी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
विशेषतः शिक्षणातील असमानता, शासकीय योजनांची अंमलबजावणी, चर्मोद्योगाला शासनाची मदत, महिला सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगार मिळावा या बाबींवर चर्चा झाली.
या कार्यक्रमास जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ, अहिल्यानगर शाखेचे सर्व पदाधिकारी, संयोजक व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.