मक्तापूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची आक्रमक फवारणी मोहीम – ग्रामपंचायत प्रशासन झोपेत!
मक्तापूर, नेवासा तालुका | प्रतिनिधी:
गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी स्वतःच्या खर्चाने फवारणी मोहीम राबवणारा एक सामान्य कार्यकर्ता गावात झळाळून उठला आहे. मक्तापूर गावातील वार्ड क्रमांक 1 आणि 3 मध्ये सामाजिक कार्यकर्ता गणेश झगरे यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा, मारुती मंदिर आणि चर्च परिसरात मोठ्या प्रमाणावर फवारणी करून स्वच्छतेचा संदेश दिला.
गणेश झगरे यांनी महिनाभर आधीच ग्रामसेवकास निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी फवारणी करण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वतःच्या खर्चातून सुमारे 2000 रुपयांची औषधं आणि 20 गवत जाळ्याच्या पुड्यांचा वापर करून संपूर्ण वार्डात फवारणी केली.
> "माझ्याकडे धनशक्ती नाही, पण जनतेचा विश्वास आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये 165 मते मला मिळाली, त्याचा आदर म्हणून मी हे कार्य करत आहे. कोणत्याही पक्षाचा विरोध माझ्याकडे नाही. गावाचा विकास हाच एकमेव ध्यास आहे," असे झगरे यांनी सांगितले.
गावात अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांची बिकट अवस्था आहे. काही ग्रामस्थांनी व्हिडिओच्या माध्यमातून परिस्थिती दाखवली असून, गणेश झगरे यांनी मुरमाचे खेपा टाकून रस्ते बनवण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाची झोप आणि कार्यकर्त्यांची जिद्द यामध्ये फरक स्पष्ट!
गावात स्वच्छ भारत अभियानाला खऱ्या अर्थाने जगवणारे झगरे म्हणतात, "ही राजकारणासाठी समाजसेवा नाही, ही जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे."
आजच्या काळात राजकीय गट-तट सोडून जर कोणी खऱ्या अर्थाने कार्य करत असेल, तर तो गणेश झगरेसारखा कार्यकर्ता आहे.
---