नेवासाउजवा कालवा कोरडा, शेतकरी आक्रमक!दुरुस्तीच्या नावाखाली शेती पाण्यावाचून, प्रशासन झोपले की काय?



नेवासा
उजवा कालवा कोरडा, शेतकरी आक्रमक!
दुरुस्तीच्या नावाखाली शेती पाण्यावाचून, प्रशासन झोपले की काय?

नेवासा.  (प्रतिनिधी)
यंदाचा पावसाळा नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरत आहे. मे महिन्यात काहीशी अवकाळी बरसात झाली खरी, पण संपूर्ण जून महिना कोरडा गेला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या, पण पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी बियाण्यांचे उगम अर्धवट राहिले. काही पिकं तर वाळू लागली आणि दुसऱ्यांदा पेरणीचा विचार शेतकऱ्यांना करावा लागतोय.

जुलैच्या सुरुवातीपासून काहीशी रिमझिम सुरू झाली असली तरी, ती फक्त जीवदान देणारी आहे – उत्पादनासाठी नव्हे. खासकरून नेवासा, राहुरी, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशा वेळी मुळा धरण हे शेतीसाठी एकमेव आशा म्हणून उरते.

मात्र सध्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. मुळा धरणात २६ टीएमसीपैकी १८ टीएमसी पाणीसाठा सध्या उपलब्ध असून धरण ७०% भरले आहे. जलसाठ्यानुसार कालवा व नदी मार्गे पाणी सोडणे आवश्यक ठरते, म्हणून कालपासून (दि. ९ जुलै) नदीपात्रात पाणी सोडले गेले आहे.

पण खरी अडचण आहे – मुळा उजव्या कालव्याचं सुरू असलेलं नूतनीकरण काम!

शंभर कोटी रुपयांचे नूतनीकरणाचे काम उजव्या कालव्यावर सुरू असल्याने, सध्या या कालव्यामार्गे शेतीसाठी पाणी सोडणे शक्य नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या कालव्यावर अवलंबून असलेल्या हजारो एकर शेतजमिनी कोरड्याच राहणार आहेत.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
"धरणात पाणी आहे, नदीला पाणी सोडताय – मग आमच्या शेतीसाठी कालवा कोरडाच का?" असा सवाल शेतकरी वर्ग करत आहेत.

प्रशासनाने पावसाळ्याच्या आधीच दुरुस्ती पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु कामाची गती आणि नियोजनशून्य धोरणामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पाण्याचं संकट ओढवलं आहे.

नेवासा तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक होऊ लागले असून, लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था न झाल्यास मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रश्न आहे – धरणात पाणी असताना शेती कोरडी का?
शेतकऱ्यांचं पाणी कुठं अडतंय?
प्रशासन उत्तर देणार का? की आंदोलनाची वाट पाहणार?

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.