श्रीक्षेत्र देवगड येथे गाव कामगार पोलिस पाटील संघटनेची राज्यस्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न – विमा, वेतनवाढ, अनुकंपा सेवा व पदोन्नतीबाबत ठोस निर्णय
नेवासा प्रतिनिधी:दि. २० जून २०२५ रोजी श्रीक्षेत्र देवगड येथे गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांची राज्यस्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी राजधर कोलते पाटील होते, तर प्रमुख उपस्थितीत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. भृंगराज परशुरामकर पाटील, संस्थापक सचिव श्री. कमलाकर मांगले पाटील, सचिव श्री. महादेव भालेराव पाटील, उपाध्यक्ष श्री. अरुण बोडखे पाटील (नाशिक), उपाध्यक्ष श्री. जब्बार पठाण, खजिनदार श्री. विश्वनाथ पाटील (रत्नागिरी), तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, संस्थापक सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नेवासा तालुक्यातील मुकिदपूर येथील जिल्हा सचिव श्री. आदेश साठे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी पोलिस पाटलांच्या कार्यपद्धतीतील अडचणी, शासन दरबारी होत असलेली उपेक्षा आणि संघटित लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. बैठकीत पोलिस पाटील वर्गाच्या विविध ज्वलंत मागण्यांवर सखोल चर्चा झाली, ज्यात पोलिस पाटलांना विमा संरक्षण लागू करणे, एस.टी. बसमध्ये राखीव जागा निश्चित करणे, सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत समाविष्ट करणे, तसेच पोलिस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करणे यांचा समावेश होता. याशिवाय पोलिस पाटलांना कायदेशीर अधिकार, जबाबदाऱ्या आणि सुरक्षितता यांचा स्पष्ट आदेश देण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीदरम्यान संघटनेच्या कार्यकारिणीत अनेक पोलिस पाटलांची कार्यकुशलतेच्या आधारे विविध पदांवर पदोन्नती करण्यात आली, ज्यामुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी संघटनेच्यावतीने शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, जर तातडीने योग्य मान्यता, सन्मान व सुविधा मिळाल्या नाहीत, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. या ऐतिहासिक बैठकीने पोलिस पाटलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून, त्यांच्या हक्कांसाठीचा लढा आता अधिक व्यापक आणि निर्णायक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष बळवंतराव काळे,राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील,विभागीय अध्यक्ष विजय घाडगे पाटील,नवनिर्वचित जिल्हाध्यक्ष थिटे पाटील, संतोष पवार पाटील, आदेश साठे पाटील, उंदरे पाटील, कोतकर पाटील, सुभाष भांगे पाटील, संदीप लहारे पाटील, महेंद्र बिडगर पाटील, साळुंके पाटील, सोमूसे पाटील, तुपे पाटील, व नेवासा तालुक्यातील सर्व सन्माननीय महिला पोलीस पाटील व पोलीस पाटील उपस्थित होते.
---