ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा २०२५ — आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साही प्रस्थान


ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा २०२५ — आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साही प्रस्थान 

 नेवासा | प्रतिनिधी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन कर्मभूमी नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक भक्तांची उपस्थिती अनुभवास मिळाली.

या पालखी सोहळ्याचे नेवासा नगरीत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील व त्यांचे मित्रमंडळ यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार लंघे यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.

या सोहळ्यात पहिला रिंगण सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. हजारो भाविक, वारकरी, साधू-संत, महंत, महिलावर्ग, तरुणाई आणि बाल वारकऱ्यांनी या रिंगणात सहभाग घेत वातावरण भारावून टाकले. विणा, टाळ, मृदुंग, फुगड्या आणि अभंग गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करणे हे माझे भाग्य आहे. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असून, या परंपरेत आपले योगदान देता येणे हे सौभाग्यच आहे."

नेवासा नगरीत झालेला हा सोहळा भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.