नेवासा तालुक्यातील पेट्रोल पंपांवर मोफत सुविधा नाही; ग्राहकांचा संताप!
नेवासा प्रतिनिधी:नेवासा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांना देण्यात यायच्या मूलभूत आणि बंधनकारक मोफत सुविधा पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत. टॉयलेट, पिण्याचे पाणी, टायरसाठी हवा, प्राथमिक उपचार पेटी, तक्रार वही, दरांचे फलक अशा सुविधा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्वच पेट्रोल पंपांवर उपलब्ध असणे बंधनकारक आहे. मात्र, नेवासा परिसरातील प्रत्यक्ष पाहणीत ही परिस्थिती फारच भयावह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्राहकांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या टॉयलेट सुविधा अनेक ठिकाणी बंद आहेत किंवा अस्तित्वातच नाहीत. काही पंपांवर टॉयलेटचे दरवाजे कुलूपबंद असून संडास बंद आहे" अशी सूचनाही लावलेली आहे. ही कृती नियमांचे सरळ उल्लंघन आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च होतात, पण इथे प्रवाशांसाठी पाणी सुद्धा उपलब्ध नाही. काही ठिकाणी तर बोतलबंद पाणी विक्रीसाठी ठेवले जाते, पण मोफत पिण्याचे पाणी कुठेच दिसत नाही.
टायरमध्ये हवा भरणे ही सुविधा देखील मोफत देणे बंधनकारक आहे, परंतु बहुतांश पंपांवर यासाठी पैसे मागितले जात आहेत. हे सरळ ग्राहकांची फसवणूक आहे. प्राथमिक उपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स) तर फक्त नावापुरती दाखवली जाते. त्यात औषधे पूर्ण नसतात, व बऱ्याच वेळा ती कुठे आहे याची माहितीही कर्मचाऱ्यांना नसते.
याशिवाय, ग्राहकांनी तक्रार नोंदवण्यासाठी ठेवलेली तक्रार वही अनेक पंपांवर मिळतच नाही. दररोजचे इंधन दर, मोजमाप यंत्र, कंपनीचा संपर्क क्रमांक आणि इतर महत्त्वाचे फलकही अनेक ठिकाणी लावलेले नाहीत. हे सर्व नियमांची थेट पायमल्ली आहे.
या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक आरोग्य, प्रवाशांचा सन्मान आणि कायद्याचे पालन या सर्व बाबी धुळीस मिळाल्या आहेत.
नेवासा तालुक्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या हक्कांची सर्रास पायमल्ली होत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक आहे. सर्व पेट्रोल पंपांची तात्काळ तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
जर अशा प्रकारेच सुविधा नाकारल्या जात राहिल्या, तर हे केवळ ग्राहकांची फसवणूक न राहता, एका सामाजिक अन्यायाचे स्वरूप घेईल. त्यामुळे प्रशासनाने यावर झोपेचं सोंग न घेता, तात्काळ कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा आहे. असे जागरूक नागरिकांकडून बोलले जात आहे
📝 नोट:
तक्रार करण्यासाठी ग्राहक खालील टोल-फ्री क्रमांकांचा वापर करू शकतात:
IOCL/HPCL: 1800-2333-555
BPCL: 1800-22-4344
(