भाजप तालुका अध्यक्ष प्रताप चिंधे व सरपंच सतीश कर्डिले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी विकासाभिमुख चर्चा
मुंबई, दि. 14 मे 2025:
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भाजपचे तालुका अध्यक्ष प्रताप राजे चिंधे व सरपंच सतीश कर्डिले यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीमध्ये कूपन आणि डोल योजना गावोगावी प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. महसूल विभागाच्या विविध योजना, शेतकऱ्यांचे सुलभ दस्तऐवजीकरण, जमिनीसंबंधी प्रक्रिया सुलभ करणे, तसेच तलाठ्यांच्या कामकाजाबाबत ग्रामपातळीवर येणाऱ्या अडचणी यावरही विशेष चर्चा करण्यात आली.
याशिवाय, पाणीटंचाई निवारण, ग्रामविकासातील योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांना रोजगाराच्या संधी या विषयांवरही रचनात्मक विचारविनिमय झाला.
यावेळी मा. बावनकुळे यांनी नेवासा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून गावोगावी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.
ही भेट नेवासा तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरणार असून, भाजपचे सामाजिक व राजकीय कार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे प्रताप चिंधे यांनी सांगितले.