नेवासा रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उल्लेखनीय पाऊल – साईड पट्ट्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू, आंदोलनाआधीच घेतला सकारात्मक निर्णय
नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा रोडवरील रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर मुरूम टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठ्या तत्परतेने सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा स्थानिक संघटनांनी आंदोलन उभे करण्याची गरज न भासता विभागाने पुढाकार घेत हे काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
नेवासा रोडच्या दुतर्फा पावसाळ्यात पाणी साचणे, धुळीचा त्रास होणे आणि अपघाताचे वाढते प्रमाण ही मुख्य समस्या होती. या पार्श्वभूमीवर विभागाने समस्येचे गांभीर्य ओळखून साईड पट्ट्यांवर मुरूम टाकण्याचे काम वेगाने हाती घेतले आहे. परिणामी, रस्ता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवासयोग्य होत आहे.
या कार्यामुळे वाहनचालकांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार असून रस्त्याची रुंदी व दृष्यमानताही सुधारत आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या त्वरित आणि सकारात्मक कृतीचे स्वागत केले आहे.
चौकट:
जनतेच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे हीच खरी लोकसेवा – बादल परदेशी
“नेवासा रोडवरील साईड पट्ट्यांची अवस्था अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. नागरिकांचे आरोग्य आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हे काम अत्यावश्यक होते. मात्र, यासाठी कुठलेही आंदोलन करावे लागले नाही, ही समाधानाची गोष्ट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकभावना ओळखून सकारात्मक पावले उचलल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे प्रतिपादन शिवमहाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक बादल परदेशी यांनी केले.
–