शेतकरयांची विश्वासघात करुन फसवणूक झाल्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीत सरकारने व राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या मतावर अवलंबून राहू नये - शेतकरी नेते त्रिंबक भदगले यांची प्रतिक्रिया
नेवासा (प्रतिनिधी) – "शेतकऱ्यांची फसवणूक ही आता केवळ राजकीय धोरण नव्हे, तर ती एक ठोस सुडाची भावना बनली आहे" – असा इशारा नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले की, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा खंबीर आधार असूनही, त्याच्याच तोंडाला गहू आणि हाताला उसनं कर्ज याचं दुखणं सरकारने कायमच लादलं आहे.
सरकारकडून कर्जमाफीचा लेखी जाहीरनामा जाहीर करूनही, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. ही गोष्ट म्हणजे सरळसरळ विश्वासघात आणि फसवणूक आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये रोष, नाराजी आणि सूडाची भावना उफाळून आली आहे, असे भदगले यांनी स्पष्ट केले.
"सत्ता शेतकऱ्यांच्या पायावर उभी असून, सरकारी तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा आहे. पण जेव्हा त्यालाच दुय्यम वागणूक दिली जाते, तेव्हा ती व्यवस्था टिकणार नाही. याची किंमत मतपेटीतून दिली जाईल, हे सरकारने लक्षात ठेवावे," असा थेट इशारा भदगले यांनी दिला.
राजकीय नेते फक्त निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतात आणि एकदा मत मिळवले की त्यांनाच विसरून जातात, अशी टीका करत "आता शेतकरीही सावध झाला आहे, आणि भविष्यात कोणत्याही पक्षावर विश्वास ठेवणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
संपर्क – त्रिंबक भदगले, नेवासा तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना – 9730620475
---