विठ्ठलवाडीतील श्री हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा होणार
धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; मान्यवर संतांची उपस्थिती आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित
खरवंडी, १६ मे (प्रतिनिधी विशाल कुऱ्हे):
विठ्ठलवाडी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, १७ मे २०२५ रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून संपूर्ण गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता महाअभिषेक व महाआरतीने होणार आहे. यावेळी मंदिरात भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. त्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता दोन मान्यवर कीर्तनकार शांतिब्रम्ह ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) आणि बालब्रम्हचारी ह.भ.प. पंढरीनाथ महाराज तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूक पार पडणार आहे.
मिरवणुकीनंतर मंदिराच्या प्रांगणात संत पुजन, संतदर्शन आणि शोभेच्या आतषबाजीचा कार्यक्रम होणार असून, यानंतर सायंकाळी ७ ते ९ दरम्यान ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांचे जाहीर हरिकिर्तन होणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंद मिळणार आहे.
या शुभदिनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील सेवानिवृत्त तसेच शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या ग्रामस्थ युवक-युवतींचा विशेष सत्कार आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. सत्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- श्रीमती गयाबाई वसंतराव आघाव मॅडम – सेवानिवृत्त
- कु. रुपाली भाऊसाहेब तांदळे – महानगरपालिका, मुंबई
- कु. सीमा गहिनीनाथ शिरसाठ – जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर
- वि. संकेत ज्ञानदेव बेल्हेकर – जिल्हा आरोग्य विभाग, मुंबई
- चि. निखिल रघुनाथ बर्जे – M.B.B.S
कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व ग्रामस्थांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
मार्गदर्शक: गावातील मान्यवर, संत मंडळी व ज्येष्ठ ग्रामस्थ
सूचना: कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.
— विशाल कुऱ्हे, प्रतिनिधी – खरवंडी
(