मारहाणीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; माजी सरपंचावर हल्ला, २२ हजारांची रोकड लंपास
नेवासा प्रतिनिधी.शनिशिंगणापूर येथील हॉटेल यश गार्डनचे मालक आणि माजी सरपंच शिवाजीराव शेटे यांच्यावर हल्ला करून २२ हजारांची रोकड लुटण्यात आल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना नुकतीच घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत यश ऊर्फ भिंगऱ्या जालिंदर भिंगारदिवे आणि सनी ऊर्फ मध्या किसन शिंदे (दोघेही रा. सोनई) यांना अटक केली आहे. या दोघांनी शेटे यांना मारहाण करत गल्ल्यातील २२ हजार रुपये लुटले होते, अशी फिर्याद पोलिसांत दाखल झाली होती.
गुन्हा घडल्यानंतर पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार नितीन सप्तर्षी, ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे आणि त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या मदतीने केवळ चोवीस तासांत आरोपींना अटक केली.
सध्या इतर सहभागी आरोपींचा शोध सुरू असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना नेवासे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.