-जलसंधारण आणि ग्रामीण पत्रकारितेतील योगदानाची दखल
नेवासा, दि. १५ (प्रतिनिधी):
गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे व जलसंवर्धनाच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेणारे पत्रकार सुखदेव फुलारी यांना स्व. सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
सुखदेव फुलारी हे ‘जलमित्र’ या ओळखीने परिचित असून त्यांनी पाणीटंचाई, जलसंधारण, पर्यावरण, शेतकरी प्रश्न आणि ग्रामीण विकासावर अनेक अभ्यासपूर्ण व संवेदनशील बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. पत्रकारितेसोबतच, ते प्रत्यक्ष मैदानात उतरून जलसंधारण प्रकल्पांमध्ये सहभागी झाले असून, अनेक गावांत पाणलोट क्षेत्र विकासाच्या उपक्रमांमुळे स्थायी बदल घडवले आहेत.
समारंभास साहित्यिक एन. बी. धुमाळ, शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, मुळा कारखान्याचे व्यवस्थापक शंकरराव दरंदले, मुळा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, डॉ. बाबासाहेब शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे, उपाध्यक्ष विनायक दरंदले, सचिव संजय गर्जे व पत्रकार सुनील दरंदले उपस्थित होते.
कार्यक्रमात अन्य मान्यवरांनाही पसायदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राहुल कुसळकर (उद्योजक), दत्ता हापसे (सामाजिक कार्य), ब्रम्हाकुमारी उषादिदी (अध्यात्म) यांचा यामध्ये समावेश होता.
तसेच, युवा प्रेरणा देणाऱ्या कुस्तीपटू आर्या गणेश शिंदे, प्रोजेक्ट मॅनेजर अतुल अशोक शिरसाठ, नौदल सैनिक ऋतुजा सचिन कवडे, आणि नेव्ही सैनिक अभिषेक शिवा जंगम यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मान्यवरांनी फुलारी यांच्या कार्याचा गौरव करताना, "त्यांची पत्रकारिता समाजाच्या मुळाशी भिडणारी असून, हीच खरी परिवर्तनाची ताकद आहे," असे उद्गार काढले