संदीप भानुदास मोटे यांच्या नेतृत्वात वडाळा बहिरोबा येथे अनधिकृत बस थांब्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन, रास्ता रोकोचे इशारे
नेवासा प्रतिनिधी : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथील जुना बस थांबा कायम ठेवून, अनधिकृत हॉटेल थांब्यांविरोधात काँग्रेसने राज्य परिवहन महामंडळाला निवेदन दिले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री संदीप भानुदास पाटील मोटे यांच्या नेतृत्वात वडाळा बहिरोबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वडाळा बहिरोबा येथील बस थांबा जुना असून, विविध आगारांच्या बस गाड्या येथे प्रवाशांची चढ-उतार करत असतात. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून काही बस चालक आणि वाहक निर्जन हॉटेलवर अनधिकृत थांबे घेत आहेत. यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. या ठिकाणी ड्रायव्हर व कंडक्टरला फुकट चहा, पाणी, नाश्ता आणि जेवण दिले जात असल्याने, बस चालक-वाहक प्रवाशांच्या हिताचा नाहक बळी घेत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धक्का बसत आहे.
काँग्रेसने राज्य परिवहन महामंडळाला त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. वडाळा बहिरोबा येथील जुना बस थांबा कायम ठेवून त्या ठिकाणी सर्व बस गाड्यांना प्रवासी चढ-उतार करण्यासाठी थांबण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
जर या समस्येचे त्वरित निराकरण न झाले, तर काँग्रेसने श्री संदीप भानुदास पाटील मोटे यांच्या नेतृत्वात वडाळा बहिरोबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.