सोशल मीडियावरून बदनामी; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नेवासा (प्रतिनिधी )सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अनोळखी इसमाने अमोल नेवासा या फेसबुक आयडीचा वापर करून नेवासे तालुका व शहरातील अनेक व्यक्तींविरुद्ध वादग्रस्त वैयक्तिक टिप्पण्या करून त्यांची बदनामी केली. ही घटना ६ डिसेंबर २०२४ रोजी उघडकीस आली, जेव्हा संबंधित फेसबुक आयडीवर अपमानजनक पोस्ट्स केल्याचे दिसून आले.
१० डिसेंबर २०२४ रोजी, सुनील गर्जे, महेश मापारी आणि अल्पेश बोरकर यांनी नेवासे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आणि त्यावर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला असून, सायबर तज्ञांच्या मदतीने आरोपीच्या फेसबुक अकाऊंटचा मागोवा घेतला जात आहे.
तपासात आरोपीच्या पोस्ट्स, टिप्पण्या आणि वैयक्तिक बदनामीचे स्क्रीनशॉटसह अन्य पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या सर्व पुराव्यांचा वापर न्यायालयीन प्रक्रियेसाठी केला जाणार आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला लवकरच अटक करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सदर घटनेमुळे नेवासे तालुक्यातील नागरिकांमध्ये भय आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे. सोशल मीडिया सुरक्षा आणि योग्य वापरावर अधिक सखोल चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे.