नगर जिल्ह्यामध्ये डॉक्टरांनी कौतुकास्पद कामिगीरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. शेतकरी कुटुंबातील तीन वर्षीय मुलीचा मनगटापासून कापला गेलेला पंजा डॉ. दमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रीया करून पुन्हा जोडला. डॉक्टरांनी केलेल्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
1 मार्च रोजी भेंडा ता. नेवासा या गावातील गदायी कुटुंबातील तीन वर्षीय अनन्या कडबाकुट्टी शेजारी खेळत होती. खेळत असताना दुर्देवाने तिचा हात कडबाकुट्टीच्या मशीनमध्ये गेल्यामुळे पूर्णपणे कापला गेला. घाबरलेल्या कुटुबीयांनी तिला तात्काळ नगर शहरातील रुग्णालयाच दाखल केले. डॉ. प्रशांत काळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले आणि त्यांना मुलीच्या उपचारांसाठी ताबडतोब सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटरमध्ये डॉ. आदित्य दमानी यांच्याकडे पाठवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉ. आदित्य दमानी यांनी अथक मेहनत घेत तब्बल 11 तास शस्त्रक्रिया केली. रात्री 8:30 वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया सकाळी 7:30 वाजेपर्यंत सुरू होती. या शस्त्रक्रियेमध्ये पंजा जोडणे, तुटलेल्या नसा जोडणे त्याचबरोबर त्वचा पूर्ववत करणे आवश्यक होते. त्यासाठी लागणारी सर्व काळजी घेण्यात आली आणि अथक परिश्रम करून मनगटापासून कापल्या गेलेल्या पंजाचे स्नायू, शिरा व रक्त वाहिन्या जोडण्यात आल्या. तसेच तुटलेला हाताचा रक्तपुरवठा सुरू करण्यात आला. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. श्रद्धा यांनी या मुलीला अकरा तास भूल दिली होती. लहान मुलीला एवढ्या वेळ भूल देणे मोठे अवघड काम होते. त्यामुळे डॉ. दमाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.
“आजच्या काळात प्लास्टिक सर्जरीने खूप प्रगती केली आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, बर्न सर्जरी, री कंन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी, हॅण्ड सर्जरी अशा विविध सब ब्रँचेस असतात. अशाप्रकारे गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार मिळाल्यास तुटलेले हात व बोट जोडले जाऊ शकतात. मायक्रो व्हॅस्क्युलर सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे. यामुळे तुटलेले हात, बोट यांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे. दुर्देवाने असे अपघात झाल्यास डॉक्टरला फोन करून कळवावे. तुटलेले हात व बोट स्वच्छ पाण्याने साफ करावे व ते स्वच्छ कपड्यात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून त्याला सील करावे. ही पिशवी बर्फाच्या पाण्यात ठेवावी व लवकरात लवकर प्लास्टिक सर्जनकडे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणे आवश्यक आहे. चार ते पाच तासात शस्त्रक्रिया सुरू झाल्यास याचे सकारात्मक रिझल्टस येणे शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये नातेवाईकांनी देखील डॉक्टरांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे,” असे डॉ. आदित्य दमानी (प्लास्टिक सर्जन) यांनी पत्रकारांशी संवाध साधताना सांगितले.