नेवासा तालुक्यात वादळाचा कहर – घरांचे पत्रे उडाले, लाखांचे नुकसान
नेवासा दि. १२ (वार्ताहर): नेवासा तालुक्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अचानक वादळ व वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः नेवासा आणि माळीचिंचोरा निपाणी निमगाव वडाळा घोडेगाव सोनई परिसरातील लांडेवाडी रोड, गणेशवाडी रोड, हिंगोणी कांगोणी, शनिशिंगणापूर आदी भागात वादळाचा जोर अधिक जाणवला.
वादळामुळे प्रचंड वाऱ्याने अनेक झाडे जमीनदोस्त झाली असून, काही झाडे थेट विजेच्या तारांवर कोसळल्याने तारा जमिनीवर आल्या. परिणामी संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळाच्या जोरामुळे नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत.
महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे सुरू केले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील तपासणीदरम्यान हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वादळामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, प्रशासनाने तातडीने मदतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
तालुक्यातील नागरिकांनी अशा आपत्तीच्या काळात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.