भेंडा येथील साखर कारखान्याच्या यार्डमध्ये इसम गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडला
भेंडा येथील साखर कारखान्याच्या यार्डमध्ये गांजाचे सेवन करत असलेल्या एका इसमाला कुकाणा पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवार, 8 मे 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7वाजता करण्यात आली.
पोलिस नाईक वासुदेव डमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोहेकॉ एस.बी. आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल वाघ, संदीप ढाकणे आणि दिलीप घोळवे यांचा समावेश होता. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पंचासमक्ष भेंडा बु।। येथील साखर कारखान्याच्या यार्डमध्ये छापा टाकला असता, नवनाथ पांडुरंग सकुंडे (वय 50, राहणार भेंडा हा इसम चिलीमच्या सहाय्याने गांजाचे सेवन करताना आढळून आला.
त्याच्याकडून गांजा ओढण्यासाठी वापरली जाणारी चिलीम, मळकट कापड आणि काडीपेटी आढळून आली. सदर साहित्य पंचासमक्ष जप्त करून त्याचा जागीच नाश करण्यात आला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीत गांजाचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले आहे.
या प्रकरणी नवनाथ सकुंडे याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8(क) व 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.