नेवासा येथे भरदिवसा 70 हजार रुपये लुटले – दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल




नेवासा येथे भरदिवसा 70 हजार रुपये लुटले – दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

 नेवासा खुर्द येथे भरदिवसा एका शाळा लिपिकाला दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने लुटून 70 हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची शालेय कागदपत्रे हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 8 मे 2025) दुपारी 1वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोनई येथील रहिवासी व आदर्श विद्यालय, नेवासा खु. येथील लिपिक संजय सुर्यभान वैरागर (वय 48) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी वैरागर यांची भाचीचे लग्न असल्याने त्यांनी शिक्षक सोसायटी, नेवासा  येथून 91 हजार रुपयांचे कर्ज चेकद्वारे घेतले. त्यापैकी 70 हजार रुपये त्यांनी एडीसीसी बँकेच्या शाखेतून रोख स्वरूपात काढले. ही रक्कम, शालेय कागदपत्रे, शाळेचे शिक्के व जेवणाचा डबा त्यांनी एका पिशवीत ठेवून पायी बसस्थानकाकडे निघाले असता, भाजी मंडई रोडवरील समाधान लॉजिंग समोर दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून आले. पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातील पिशवी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून नगरपंचायत दिशेने पळ काढला.

ही घटना घडत असताना फिर्यादी वैरागर यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांच्या तावडीत सापडले नाहीत. या दरम्यान त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. चोरट्यांनी लुटलेली पिशवीत 500 रुपयांच्या 100 नोटा, 200 रुपयांच्या 100 नोटा असा एकूण 70,000 रुपये रोख, शालेय शिक्के, इनकम टॅक्स व शिक्षक संच मान्यतेशी संबंधित कागदपत्रे, चेक बुक, स्टॅम्प पॅड, व जेवणाचा डबा असा मालमत्ता समाविष्ट आहे.

या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.