नेवासा फाटा येथे संस्कृती, संस्कार व स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन
13 ते 25 वयोगटातील मुलींनी घेतला उस्फूर्त सहभाग; कराटे, योगासने, ध्यानसाधना व विविध उपक्रमांचे आयोजन
स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित आणि परमपूज्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने संस्कृती, संस्कार व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज दिनांक 10 मे रोजी सकाळी 9 वाजता नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे उत्साहात पार पडले.
या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन ह.भ.प. महंत देवीदास महाराज म्हस्के (श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा) व वंदना दीदी (प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर, नेवासा) यांच्या शुभहस्ते, तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक मा. साहेबराव घाडगे पाटील आणि अध्यक्षा सौ. सुमतीताई घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना ह.भ.प. देवीदास महाराज म्हस्के यांनी नारीशक्तीचे ऐतिहासिक महत्त्व, तिची शस्त्र आणि शास्त्रातील कामगिरी यांचा उल्लेख करत स्त्रीशक्तीचा गौरव केला. वंदना दीदी यांनी ध्यानसाधना, आत्मिक उन्नती आणि स्वसंरक्षणात संयम आणि धैर्याचे स्थान यावर मार्गदर्शन केले.
या वेळी वर्ग अधिकारी चारुताई कडुरकर, वर्गपालक जयप्रकाश खोत, अमृता ताई नळकांडे, कृपाताई श्रोत्रिय, श्रीकांत नळकांडे, प्रशांत बहिरट, श्रीकांत काळे, आदिनाथ पटारे, गणेश जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अमृताताई नळकांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हे शिबिर पुढील १० दिवस विविध उपक्रमांसह राबवले जाणार आहे. त्यात कराटे, लाठी-काठी, यष्टी, तलवारबाजी, भालाफेक, रायफलबाजी, योगासन, ध्यानधारणा, तसेच बौद्धिक सत्र, अंतराळ विज्ञान, जंगल सफारी, सामान्य ज्ञान, चरित्र अभ्यास, चित्रकला, रांगोळी स्पर्धा आणि मनोरंजनपर कार्यक्रम यांचा समावेश आहे.
तालुक्यातील 13 ते 25 वयोगटातील मुलींनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.