अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन व विकास समितीची महत्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित योजनांचे पुनरावलोकन तसेच स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी मतदारसंघातील विविध विभागांच्या प्रलंबित व रखडलेल्या कामांकडे लक्ष वेधले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देत, प्रशासनाच्या कार्यपद्धतीत गती आणण्याचा पुनरुच्चार केला.
या बैठकीला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिवाजीराव गर्जे, नरेंद्र दराडे, सत्यजीत तांबे, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, डॉ. किरण लहामटे, काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते आणि अमोल खताळ पाटील आदी लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पाणीपुरवठा योजना, रस्ते व बांधकाम, शिक्षण, आरोग्य, शेती, जलसंधारण आदी विषयांवर चर्चासत्र झाले. नागरिकांच्या गरजांनुसार योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
---