स्पेस ऑन व्हिल' उपक्रमाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली


'स्पेस ऑन व्हिल' उपक्रमाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली

नेवासे (प्रतिनिधी) - श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात इस्त्रो (ISRO) आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्पेस ऑन व्हिल' या फिरत्या बस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे अंतराळ विज्ञान, उपग्रह आणि इस्त्रोच्या प्रक्षेपकांची माहिती घेतली.

'स्पेस ऑन व्हिल' उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची गतीशील व मनोरंजक माहिती मिळाली. विशेषतः इस्त्रोच्या पहिल्या मानवी मोहिमेतील भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या गगनयानाची प्रतिकृती पाहून अनेक विद्यार्थ्यांना अंतराळात असण्याचा भास झाला.

या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाबद्दल जागरूकता प्राप्त झाली आणि काहींना वैज्ञानिक प्रेरणा मिळाली. तसेच, काही विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रात करियर करण्यासाठी आवड निर्माण झाली, असे सांगितले.

प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अरूण घनवट, उपप्राचार्य राधा मोटे, क्रीडा संचालक प्रा. सुनील गजे, प्रदर्शन संयोजक प्रा. हरिश्चंद्र माने, प्रा. मयूर जामदार, प्रा. कविता जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या अभिनव उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी महाविद्यालयाचे व शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

'स्पेस ऑन व्हिल' हा उपक्रम इस्त्रो आणि विज्ञान भारती यांच्या सहकार्याने भारतभर राबवला जात आहे. श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने ही अद्वितीय संधी विद्यार्थ्यांना दिली, ज्यामुळे त्यांना अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्याची संधी प्राप्त झाली.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.