घोडेगाव (नेवासा) : नेवासा तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतीच्या आठवडे बाजार कर व सायकल स्टँडच्या लिलाव प्रक्रियेला चार वर्षांनी सोमवारी (दि. १०) अखेर पूर्णत्व मिळाले. ग्रामपंचायतीचे प्रशासक गणेश सवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लिलावात १३ जणांनी सहभाग घेतला.
घोडेगाव हे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या जनावरांचा बाजार आणि कांद्याच्या विक्रमी आवकासाठी ओळखले जाते. ग्रामपंचायत अधिकारी दादासाहेब काळे यांनी (दि. ३ डिसेंबर) लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली होती. लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांना अनामत रक्कम भरण्याची मुदत दिली होती, ज्यात १३ व्यक्तींनी आपली अनामत रक्कम भरली.
आठवडे बाजार कर लिलावासाठी प्रति महिन्याला दोन लाख अकरा हजार रुपयांची बोली लागली, जी नीलेश शिरसाट यांनी जिंकली. सायकल स्टँड लिलावासाठी प्रति महिन्याला ५३ हजार रुपये बोली अमोल बर्ड यांनी लावली. यामुळे भाजीपाला बाजार, जनावरांचा बाजार आणि पार्किंगसाठी कर वसुली केली जाईल, ज्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.
लिलाव प्रक्रिया गटविकास अधिकारी लखवाल यांच्या आदेशाने ग्रामपंचायत प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. लिलावावेळी सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.