देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे, मारकडवाडीत शरद पवार यांचं वक्तव्य



आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. आज सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात ईव्हीएम हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले की, लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे. आम्ही गेले दोन-तीन दिवस बघतोय की, तिथले खासदार देशातल्या अनेक राज्यांचे आम्हाला भेटतात, ते दुसरी काहीही चर्चा करत नाहीत, तर तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की, हे गाव कुठे आहे? हे सबंध देशातल्या समंजस आणि शहाण्या लोकांच्या लक्षात आलं नाही, ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं? तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन आज देश करतोय याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.”

ते म्हणाले, ”निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात. कधी पराभव होतो, काही तक्रारी येतात. पण सबंध देशाला, सबंध राज्याला निवडणुकी संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका का येते? याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि जो मतदार आहे, त्याला खात्री वाटत नाही. म्हणणं काय? आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही बटण दाबता त्याच्यनंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झालं म्हणून. पण काही निकाल असे आलेत की, त्यामुळे तुमच्या मनात शंका आली. फक्त तुमच्या मनात नाही, अनेक गावच्या लोकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ झाले, याच्यात कुठेतरी दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केलं जातं? याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागली.”

शरद पवार पुढे म्हणाले की, ”अमेरिका हा आज जगातला मोठा देश आहे. अमेरिकेमध्ये मत मतपेटीत टाकलं जातं. जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिथेही मत मतपेटीमध्ये टाकलं जातं. युरोप खंडातले सर्व देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर निवडणुका घेत नाहीत. अमेरिकेने आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की, आता हे ईव्हीएम नको. काय असेल ते लोकांना मतपेटीत टाकण्याचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांनी तो दिला. अख्खं जग करतंय आमच्याच देशात का? आमच्याकडे शंका निर्माण होतेय. त्या शंकेमुळे लोक अस्वस्थ आहेत, काही गोष्टी दिसतात. आत्ताच जयंत पाटील यांनी तुम्हाला पोस्टल आणि ईव्हीएम मतदानाच्या कलाची आकडेवारी सांगितली. त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की, याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली त्या माहितीत काय दिसतं? की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले? याचे आकडे त्या मतदानासारखे नाहीत. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की, आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली.”


        
        
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.