“सौंदाळा ‘जातमुक्त’ ठरावाचा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीने केला जाहीर सत्कार!” – गणपतराव मोरे यांचा ठाम इशारा : “आता गावात जात नाही, फक्त माणूस!”
भेंडा / सौंदाळा (ता. नेवासा) प्रतिनिधी :
देशातील पहिल्या ग्रामपंचायतीपैकी एक ठरणारा ऐतिहासिक आणि संविधानिक निर्णय सौंदाळा ग्रामपंचायतीने घेतला असून, ग्रामसभेतून “गावात जातिभेद होणार नाही” असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लोकनियुक्त सरपंच कॉ. शरदराव बाबा आरगडे यांचा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
हा सत्कार कार्यक्रम बहुजन सामाजिक फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते गणपतराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जागधने गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक मार्गदर्शक बाबासाहेब कनगरे, युवा कार्यकर्ता राम मगरे, पंडित गुरुजी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गणपतराव मोरे यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की,
“सौंदाळा गावाने जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देणारा आहे. आता गावात जात नाही, फक्त माणूस राहील!”
ग्रामसभेच्या ठरावामुळे गावात सामाजिक सलोखा कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.