👇
🔥 उपोषणाचा तिसरा दिवसही प्रशासन ढिम्मच! वंचित बहुजन आघाडीचा थेट पाठिंबा – पोपटराव सरोदे, विजय “अंकल” गायकवाड आंदोलनस्थळी दाखल
नेवासा : डौले वस्ती, नेवासा बु. येथील जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना देण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होत आहे.
रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कचरू तोडमल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणाला आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे आणि अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष विजय “अंकल” गायकवाड व घमाजी जाधव तसेच खडका फाटा चे माजी सरपंच पठाण हे आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली.
नेत्यांनी सांगितले की, “जप्त व पंचनामा झालेली वाळू इतर ठिकाणी घरकुलांसाठी देण्यात आली, मग डौले वस्तीतील वाळूबाबत दुजाभाव का? प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन ही वाळू घरकुल लाभार्थ्यांना द्यावी, अन्यथा आंदोलनाचा व्याप वाढवण्यात येईल व घंटा नाद आंदोलन करण्यात येईल.”
तसेच प्रशासनाच्या भूमिकेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.