नेवासे पोलिसांची धडक कारवाई! तरवडी चौकात देशी पिस्तूलसह तरुण अटक; वाहनासह 4.50 लाखांचा मुद्देमाल जप्त


नेवासे पोलिसांची धडक कारवाई! तरवडी चौकात देशी पिस्तूलसह तरुण अटक; वाहनासह 4.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

नेवासा ( प्रतिनिधी)अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सोनई व परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबार घटनांमुळे खळबळ उडाली असताना, नेवासे पोलिसांनी आज मोठी आणि धडक कारवाई करत यश मिळवले आहे. नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार शहाजी आंधळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तरवडी चौकात सापळा रचून एका मालवाहू वाहनातील चालकाला देशी बनावटीच्या पिस्तूलसह जेरबंद करण्यात आले.
शनिवारी मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार, कुकाणा गावाजवळ नेवासे फाटा – शेवगांव रोडवर एका सुजुकी कंपनीच्या मालवाहू वाहनात (क्र. एम.एच.१६ सी.डी. ४४०५) एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती कुकाणा पोलिसांना मिळाली होती. ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना कळवण्यात आली. त्यानंतर कुकाणा पोलीस दूरक्षेत्रात दोन पंचांना बोलावून पोलिसांनी तरवडी चौकात सापळा रचला. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, बाळू सावंत, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत घाडगे, श्रीधर लिपणे यांच्यासह पथकाने नियोजनबद्धपणे सापळा लावून वाहनाची वाट पाहिली.
सापळ्यात संशयित वाहन येताच पोलिसांनी ते थांबवून पंचांसमक्ष चालकाची अंगझडती घेतली. त्यावेळी चालकाने आपले नाव संतोष कारभारी नरोटे (वय २२), राहणार मोहरी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर असे सांगितले. तपासणीदरम्यान त्याच्या कमरेत देशी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) आढळले. मॅगझीन उघडून पाहिल्यावर त्यात तीन जिवंत काडतुसे सापडली. परवान्याबाबत विचारले असता आरोपीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईत देशी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह), तीन जिवंत काडतुसे आणि मालवाहू वाहन (क्र. एम.एच.१६ सी.डी. ४४०५) असा एकूण ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांनी नेवासे पोलीस ठाण्यात गु. र. नं. १११/२०२६ अंतर्गत शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, संदीप ढाकणे, होमगार्ड बाळू सावंत, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत घाडगे, श्रीधर लिपणे यांचा समावेश होता.
या धडक कारवाईमुळे नेवासे तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले असून अशा घटनांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.