राजमाता जिजाऊंच्या विचारांची मशाल पेटली; मक्तापूरात भव्य सन्मान सोहळ्यात चार कर्तृत्ववानांचा गौरव
मक्तापूर (ता. नेवासा) |
राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मक्तापूर येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्याने समाजमनात स्वराज्य, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांची ज्वाला पुन्हा एकदा प्रज्वलित केली. सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी मारुती मंदिर परिसरात मराठा सूकाणू समितीच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात सामाजिक, पत्रकारिता, मानवअधिकार व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानाने गौरवण्यात आले.
मराठा सूकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास श्रीराम साधना आश्रम, मुकिंदपुर येथील महंत सुनीलगिरी महाराज, पिचडगाव येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर हजारे महाराज, तसेच आशिर्वाद लाभले.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वीर एकलव्य चौक व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व मान्यवरांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ना. शंकरराव गडाख, युवा नेते मा. उदयनदादा गडाख यांच्यातर्फे विश्वासराव गडाख, तसेच माजी पंचायत समिती सभापती मा. रावसाहेब कांगुणे यांनी उपस्थिती दर्शवली.
🔹 श्री. बादलभाऊ परदेशी – उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
🔹 सौ. हिराताई आबासाहेब शिरसाठ (उपाध्यक्षा, राष्ट्रीय मानवअधिकार हक्क समिती, महाराष्ट्र) – जिजाऊ पुरस्कार
🔹 श्री. तुकाराम मोहनीराज बर्डे – मराठा भूषण पुरस्कार
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महंत सुनीलगिरी महाराज यांनी राजमाता जिजाऊंच्या राष्ट्रघडणीतील ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला. रामदासजी गोल्हार यांनी जिजाऊंच्या शिकवणी आजच्या पिढीसाठी कशा मार्गदर्शक ठरतात, हे ठासून मांडले. कार्यक्रमाचे प्रभावी व सशक्त सूत्रसंचालन संजूबाबा गायकवाड यांनी केले.
यावेळी बादल परदेशी यांनी जिजाऊंच्या संस्कारांची आठवण करून देत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली. पोलीस पाटील आदेश साठे यांनी सर्व मान्यवरांचा सन्मान करत पुरस्कारार्थींच्या कार्याचा अभिमान व्यक्त करून आभार मानले.
मक्तापूरचे पोलीस पाटील लहारे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे कौतुक करत राजमाता जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला. युवा नेते विश्वासराव गडाख यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान करत जिजाऊंच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे मराठा सूकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश झगरे यांनी आपल्या मनोगतात समाजकार्याविषयीची तळमळ व्यक्त करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास पिचडगावचे सरपंच पोपटराव हजारे, ग्रामपंचायत उपसरपंच शेषराव बनसोडे, जालिंदर पाटील निपुंगे, दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ, पत्रकार सुमित पठारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे, अविनाश गोरक्षनाथ बर्डे, शिवसेना शिंदे गटाचे मनोज झगरे, तसेच पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर करत समाजघडणीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा भव्य सोहळा पंचक्रोशीसाठी प्रेरणादायी ठरला असून, नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली.