*ट्रॅक्टरचलित ऊस बेणे लागवड यंत्राची यशस्वी चाचणी*

*ट्रॅक्टरचलित ऊस बेणे लागवड यंत्राची यशस्वी चाचणी*

शहरटाकळी ता. शेवगाव येथील प्रगतशील शेतकरी मुकुंद लक्ष्मण टाक यांच्या शेतात, श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांचे वतीने ट्रॅक्टरचलित एक ओळ ऊस बेणे लागवड यंत्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ऊस शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत्या लागवड खर्चाचे प्रमुख कारण म्हणजे मजूर समस्या. ऊस लागवड करत असताना ऊस बेणे तोडणे, त्याचे दोन डोळे बेणे तयार करणे, शेत तयार करून सरी पाडणे नंतर या सरीत मजुरांच्या साह्याने ऊस बेणे सरीत दाबून घेणे आणि यासाठी सरीत पाणी चालू असणे गरजेचे असते म्हणजे वीज पुरवठा देखील यावेळी असणे आवश्यक ठरते. या समस्यांवर मात करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित एक ओळ ऊस बेणे लागवड यंत्र उपयोगी ठरेल असे कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ इंजि. राहुल एस. पाटील यांनी सांगितले. या यंत्राच्या साह्याने, ऊसाचे दोन डोळे बेणे कापणे, सरी पाडणे व सरीत ऊस बेणे लागवड करणे तसेच खत पेरणी आणि तणनाशक फवारणी अशी पाच कामे एकाच वेळी केली जातात. या यंत्राच्या साह्याने एक एकर ऊस लागवडीसाठी २.५ ते ३ तास लागतात. हे यंत्र चालविण्यासाठी कमीत कमी ४५ hp चा ट्रॅक्टर आवश्यक आहे. या यंत्रामध्ये ऊस पिकाच्या दोन सरीतील अंतर कमी जास्त करता येते. दोन सरीतील अंतर कमीत कमी ३ फूट ठेवता येते तर, त्यापेक्षा अधिक अंतर कितीही ठेवता येते. ऊस लागवडीसाठी या यंत्राचा वापर भविष्यात शेतकऱ्यांना लागवड खर्चात बचत आणि मजूर समस्यावर प्रभावी उपाय ठरणार आहे. ऊस शेती नक्कीच परवडणारी आहे त्यासाठी लागवड खर्चात बचत करणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केव्हीके चे प्रमुख डॉ. कौशिक यांनी केले. या यंत्राच्या शेतावरील चाचणी वेळी प्रगतशील शेतकरी जगन्नाथ गादे, राजेंद्र जगदाळे, किशोर टाक, राजेंद्र गादे, साईनाथ गुंजाळ, मिठूआप्पा शेटे, रामभाऊ उंदरे, दत्तात्रय वंजारी इ. उपस्थित होते.
· एक एकर ऊस लागवड २.५ ते ३ तासात शक्य  

· उसाच्या दोन सरीतील अंतर कमी जास्त करता येते.

· ऊस लागवडीची पाच कामे- सरी पाडणे, खत पेरणी, बेणे कापणी, लागवड, तणनाशक फवारणी एकाच वेळी करणे शक्य   

ट्रॅक्टरचलित ऊस बेणे लागवड यंत्रामुळे ऊस लागवड करण्यासाठी मला मजूर, वीज यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या यंत्राच्या वापरामुळे ऊस लागवडीच्या खर्चात तसेच वेळेतही बचत झाली. प्रगतशील शेतकरी- श्री. मुकुंद लक्ष्मण टाक
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.