पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी बहिरवाडी येथे एक लाख भाविकांनी घेतले श्रीकालभैरवनाथांचे दर्शन
-नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे पौष महिन्यातील आलेल्या दुसऱ्या रविवारी सुमारे एक लाख भाविकांनी जागृत असलेल्या श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले.या निमित्ताने मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती.यावेळी "नाथाच चांगभल" च्या गजराने श्री क्षेत्र बहिरवाडी दुमदुमली होती
नेवासा शहरापासून उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर असलेले बहिरवाडी हे श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे.श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या क्षेत्राचा कायापालट झाला आहे.पौष महिन्यात येणारे रविवार हे नवसाचे मानले जात असल्याने दुसऱ्या पौष रविवारी सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.
पूर्वी येथे श्री कालभैरवनाथांना पशू बळी दिला जायचा मात्र भगवंत हा भावाचा भुकेला असून मुक्या जीवाला बळी न देता श्री कालभैरवनाथांना आवडता डाळ रोडग्याचा नैवैद्य देवाला अर्पण करून नवसपूर्ती करा असे प्रबोधन देवगड गुरुदेव दत्त पिठाचे गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी बाबांनी केल्यानंतर येथे बळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून बंद करण्यात आली आहे.
पौष महिन्यात आलेल्या दुसऱ्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून विविध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सेवेकरी बनून स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली.तसेच ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमातून योगदान दिले.पौष रविवार निमित्त मंदिर प्रांगणात विविध स्टॉल खेळणी गृहपयोगी वस्तूंच्या विविध दुकाने थाटण्यात आल्याने बहिरवाडीला यात्रेचे स्वरूप आले होते.
प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा