नेवाशात नगरपंचायत निवडणुकीसाठी ७८.०७ टक्के विक्रमी मतदाननगराध्यक्ष पदासह १७ जागांसाठी मतदान शांततेत पार; १४,६०८ मतदारांचा सहभाग



नेवाशात नगरपंचायत निवडणुकीसाठी ७८.०७ टक्के विक्रमी मतदान
नगराध्यक्ष पदासह १७ जागांसाठी मतदान शांततेत पार; १४,६०८ मतदारांचा सहभाग

नेवासा प्रतिनिधी. नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी (दिनांक २० डिसेंबर) झालेल्या मतदानात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. एकूण १८ हजार ७१२ मतदारांपैकी तब्बल १४ हजार ६०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी ७८.०७ इतकी नोंदवली गेली आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या १७ जागांसाठी मतदान झाले. नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण मतदारांमध्ये ९,२९२ पुरुष व ९,४२० महिला मतदारांचा समावेश होता. प्रत्यक्ष मतदानात ७,४१७ पुरुष व ७,१९१ महिलांनी मतदान केले.
शहरातील २२ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा टक्का कमी असला तरी दुपारनंतर चित्र बदलले. सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. पहिल्या दोन तासांत केवळ ७.७२ टक्के मतदान झाले होते. साडेअकरापर्यंत १५.०३ टक्के, दीड वाजेपर्यंत २८.१५ टक्के, साडेतीन वाजेपर्यंत ४५.९१ टक्के मतदान झाले आणि शेवटी मतदानाची टक्केवारी ७८.०७ वर पोहोचली.
निवडणूक प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (दि. १९) रात्री १० वाजता थंडावल्या होत्या. मागील महिनाभर सुरू असलेल्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप झाले, मात्र शहरात केवळ तीन मोठ्या सभा पार पडल्या. प्रचारात उमेदवारांनी प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा व गाठीभेटींवर अधिक भर दिला.
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निर्णय अधिकारी डॉ. संजय बिरादार व मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतदान केंद्रांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रभागनिहाय मतदान पुढीलप्रमाणे :
प्रभाग १ – ६६८ (७३.३३%)
प्रभाग २ – ९९५ (८०.६९%)
प्रभाग ३ – ८५२ (७८.५३%)
प्रभाग ४ – १,११५ (७४.८०%)
प्रभाग ५ – ८६३ (७५.३७%)
प्रभाग ६ – ६२९ (८८.८४%)
प्रभाग ७ – १,०९८ (७५.२०%)
प्रभाग ८ – ३४५ (७९.६८%)
प्रभाग ९ – १,०५५ (७५.१४%)
प्रभाग १० – ८४६ (७७.२६%)
प्रभाग ११ – ८०९ (७७.१९%)
प्रभाग १२ – ८०७ (७५.४२%)
प्रभाग १३ – ९७५ (८१.१८%)
प्रभाग १४ – १,०६७ (८५.२२%)
प्रभाग १५ – ८३७ (७६.५०%)
प्रभाग १६ – ७४१ (७८.२५%)
प्रभाग १७ – ९०६ (७९.६८%)
नेवासा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रविवार (दिनांक २१ डिसेंबर) रोजी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत होणार असून, निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.