नानाभाऊ पटोलेंच्या संभाव्य दौऱ्याने नेवाशातील राजकारण तापले
अल्ताफ पठाण यांच्या प्रचारासाठी सांगता सभेला येण्याची जोरदार चर्चा
(नेवासा प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अल्ताफखान पठाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी सभापती नानाभाऊ पटोले हे नेवाशात येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, हा दौरा अजून अधिकृतरीत्या निश्चित झालेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेस अध्यक्ष संभाजी माळोदे यांनी नागपूर येथे नानाभाऊ पटोले यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रचारासाठी नेवाशात येण्याची विनंती केली होती. त्यानंतर शेवटच्या दिवशी सांगता सभा व प्रचार रॅलीसाठी नानाभाऊ पटोले येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेमुळेच नेवाशातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता व चैतन्य निर्माण झाले आहे.
नानाभाऊ पटोले यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या संभाव्य उपस्थितीनेच विरोधकांच्या गोटात हालचाली वाढल्या असून, निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. नेवाशात अनेक मोठ्या नेत्यांचे दौरे होण्याची चर्चा असून, त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात अधिकच आक्रमक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी माळोदे यांनी, “नानाभाऊ पटोले यांच्या दौऱ्याबाबत चर्चा सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती दिली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष नानाभाऊ पटोले नेवाशात येतात का, याकडे लागले आहे.
---