कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे पीएम किसान सन्मान निधी कार्यक्रमाचे आयोजन* *(नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शाश्वत ऊस शेती गरजेची - मा.आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील)*




*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे पीएम किसान सन्मान निधी कार्यक्रमाचे आयोजन*

 

*(नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शाश्वत ऊस शेती गरजेची - मा.आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील)*

 

          श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २१ वा हप्ता हस्तांतरण कार्यक्रमाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे व श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील हे उपस्थित होते.

          पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत २१ व्या हप्त्याचे थेट ९ कोटी शेतकऱ्याच्या खात्यात रु १८ हजार कोटी रक्कमचे हस्तांतरण माननीय प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते कोईमतुर,तमिळनाडू येथून करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानाअंतर्गत गहू समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          के. व्ही. के. दहिगाव ने येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, शेतीमध्ये संख्यात्मक उत्पादन न घेता गुणात्मक उत्पादनावर भर दिला पाहिजे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे ऊसाव्यतिरिक्त इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शाश्वत उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी ऊस शेतीकडे वळावे. कृषी विज्ञान केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे तसेच शेतीतील नवीन तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे असे आवाहन केले.

          प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले. पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान व गहू उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी मार्गदर्शन केले. रब्बी कांदा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर नंदकिशोर दहातोंडे, शास्त्रज्ञ उद्यानविद्या विभाग व रब्बी हंगामातील विविध पिकांविषयी नारायण निबे शास्त्रज्ञ कृषिविद्या विभाग यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

          या राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत गहू पिकाचे जास्त प्रथिने, लोह व झिंक युक्त नवीन वाण एच. आय.१६३३ (पुसा वाणी) बियाणे, बीज प्रकिया निविष्ठा व फवारणीसाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये त्याच बरोबर आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक अंतर्गत कांदा पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापणासाठी फर्टीगेशन तंत्रज्ञानाव्दारे विद्राव्य खतांचा वापर, कांदा पिकातील तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर तसेच तंत्रज्ञान तपासणीमध्ये कांदा पिकातील एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापणासाठी सेंद्रिय शेतीव्दारे जीवामृत तंत्रज्ञानाचा वापर यासाठी आवश्यक निविष्ठांचे लाभार्थी शेतकर्‍यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

          कार्यक्रमास जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने चे प्रशासकीय अधिकारी श्री कारभारी नजन सर, पत्रकार रामकिसन माने, शहाराम आगळे, तसेच केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी व कार्यक्षेत्रामधील २५० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी तर आभार इंजि. राहुल एस. पाटील यांनी मानले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.