पत्रकारितेची अपरिपक्वता लोकशाहीचा गळा घोटते का?* निवडणुकीत उमेदवारांची खरी चित्रं दडपण्याचा धोकादायक प्रवाह

*पत्रकारितेची अपरिपक्वता  लोकशाहीचा गळा घोटते का?*                                  निवडणुकीत उमेदवारांची खरी चित्रं दडपण्याचा धोकादायक प्रवाह

निवडणुकीच्या काळात प्रत्येक लोकप्रतिनिधी — तो राष्ट्रीय पक्षाचा असो, स्थानिक पक्षाचा असो, अथवा अपक्ष असो — स्वतःच्या कामावर, सामाजिक योगदानावर आणि जनतेतील स्वीकारण्यावर उभा असतो. लोकशाहीचे सौंदर्यच हे की प्रत्येकाला समान संधी मिळावी. परंतु अलीकडच्या काळात माध्यमांच्या भूमिकेबाबत एक चिंताजनक प्रवृत्ती दिसून येते: काही पत्रकार निवडणूक सुरुवातीलाच “स्पर्धा फक्त दोनच उमेदवारांमध्ये आहे” असे चित्र रंगवतात.

हे चित्र पत्रकारांचे अपरिपक्व लेखन नाही; तर लोकशाहीचे नुकसान करणारे दिशादर्शक विधान आहे.

अपक्ष उमेदवार किंवा सामाजिक कार्यातून पुढे येणारी माणसे, ज्यांनी वर्षानुवर्षे जनतेसाठी काम केलेले असते, त्यांना माध्यमांकडून योग्य स्थानच दिले जात नाही. अशा व्यक्तीच्या कामाची, भूमिकेची आणि पार्श्वभूमीची माहिती प्रामाणिकपणे न देता जर पहिल्या दिवसापासूनच निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार आहेत असे भासवले गेले, तर मतदारांवर मानसिक परिणाम होतो. मतदाराच्या मनात “जिंकणार तर याचपैकी कुणीतरी” अशी भावना निर्माण केली जाते, आणि निष्पक्ष निवडणुकीचा आत्माच हरवतो.

हा एक प्रकारचा आडमार्गे प्रचार आहे.

लोकशाहीत माध्यमांची मोठी भूमिका आहे — परंतु माध्यमांनी स्वतःचा प्रभाव समजून घेत सावधपणे काम करणे गरजेचे आहे. उमेदवार कोणत्याही स्तराचा असो — ग्रामपंचायतीचा, नगरपरिषदेचा, जिल्हा परिषदेतला किंवा विधानसभेचा — त्या क्षेत्रातील सर्वच उमेदवारांची नावे, पार्श्वभूमी आणि कामाची माहिती प्रसारित करणे ही पत्रकारितेची मूलभूत जबाबदारी आहे.

परंतु वास्तव असे की मोठ्या बॅनरखाली चालणारी टीव्ही चॅनेल्स, न्यूज पोर्टल्स आणि मुख्य प्रवाहातील प्रिंट माध्यमे “प्रमुख पक्षांचे उमेदवार” यांनाच केंद्रस्थानी ठेवतात. त्यांची रोजची हायलाइट, त्यांचे दौरे, त्यांचे भाषण हे दाखवताना इतर उमेदवारांना कधी मुद्दाम, तर कधी अनवधानाने दुर्लक्षित केले जाते.

यातून निर्माण होणारे तीन गंभीर परिणाम:

१) मतदाराच्या स्वतंत्र विचारक्षमतेवर परिणाम

जेव्हा माध्यमे आधीच “लढत दोनच उमेदवारांमध्ये” असल्याचे सांगतात, तेव्हा मतदाराची निवड करण्याची मानसिक प्रक्रिया प्रभावित होते.
हे निवडणूक आयोगाच्या “फ्री आणि फेअर इलेक्शन”च्या तत्त्वांना धक्का देणारे आहे.

२) अपक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांचा पराभव ठरलेला

जे उमेदवार प्रत्यक्ष कामाच्या बळावर उभे राहतात, माध्यमांनी त्यांना दाखवलेच नाही तर त्यांची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचत नाही.
अशा उमेदवारांना पराभूत करण्यासाठी यापेक्षा सोपा मार्ग कोणता?

३) राजकीय पक्षांच्या हितासाठी एकतर्फी प्रसार

पत्रकारांनी स्वतःची जबाबदारी न समजून घेतल्यास, पत्रकारिता ही जनतेची आवाज न राहता काही पक्षांची प्रचारयंत्रणा बनते.

लोकशाहीची खरी ताकद ही मतदाराचा निर्णय असतो — पत्रकारांचा नव्हे.
म्हणूनच माध्यमांनी उमेदवार कोण? त्यांचा इतिहास काय? समाजासाठी त्यांनी काय केले? यांचा प्रामाणिक आणि सर्वसमावेशक आढावा द्यायला हवा.

निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे.
या सणात माध्यमांनी केवळ मोठ्या पक्षांचे ढोल वाजवू नयेत; तर प्रत्येक उमेदवाराला समान व्यासपीठ मिळेल हे पाहणे हीच खरी स्वतंत्र पत्रकारिता आहे.

कारण लोकशाहीचा गळा राजकारणी घोटत नाहीत,
कधी कधी तो माध्यमांच्या पेनातून घोटला जातो. *ऍड.पांडुरंग केशव औताडे 9890273656*
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.