“मालेगाव अत्याचार प्रकरणाचा नेवासेत तीव्र निषेध; नराधमाला फाशीची जोरदार मागणी”
नेवासा, दि. २२ (प्रतिनिधी)
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिरमुडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी नेवासे तालुका सकल मराठा समाजातर्फे आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा निषेध करत आरोपीला तातडीने भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गावरील नेवासे फाटा, राजमुद्रा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. युवकांनी संतापजनक घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात कृष्णा मोटे, अनिकेत बोरुडे, प्रमोद घोलप, इरफान शेख, जाहिद शेख, पंकज नवगिरे, पार्थ मोटे, गणेश झगरे यांसह अनेक मराठा बांधवांनी सहभाग घेतला. सर्वांनी या भयंकर घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला.
विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून युवकांनी जबाबदारीची व संयमाची भूमिका घेत शांततेत निषेध नोंदवला. त्यानंतर नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संपूर्ण प्रकरणामुळे मराठा समाजात संतापाची ठिणगी असून आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा देऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा, असा एकमुखी आवाज आंदोलनातून उमटला.