दैनिकासाठी विशेष लेख
पोळा २०२५ : बळीराजाच्या आनंदामागची वेदना
पोळ्याचा सण आला आहे. पोळा म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळीच..! गावोगावी बैल सजतील, गोडधोड बनेल, चिमुकले नैवेद्य खाऊ घालतील, आणि महिला मंडळी बैलजोडींना ओवाळतील. हा आनंदाचा क्षण आहे. पण या उत्सवाच्या चमकदार आवरणामागे एक खोल वेदना लपलेली आहे... शेतकऱ्याच्या आयुष्याची.
पोळ्याच्या आदल्या आठवड्यातच नांदेडसह राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, मका आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. हजारो शेतकरी आपल्या बैलांना सजवतील, पण त्यांच्या पोटातली काळजी मात्र कुणालाही दिसणार नाही.
दरवर्षी शेतकरी काहीतरी गमावतोच – दुष्काळात बी-बियाणं, अवकाळी पावसात पीक, बाजारातल्या भावाखाली घामाचे पैसे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात सुमारे ३० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यातील जवळपास ४०% केवळ मराठवाड्यात. २०२३-२४ मध्येच ७ जिल्ह्यांत १२ लाख हेक्टर क्षेत्र अतिरेकी पावसाने बाधित झालं.
हे चित्र सांगतं की ‘धान्याचा दाता’ म्हणून गौरवला जाणारा बळीराजा आज ‘बलिदानाचा राजा’ होत चाललाय.
शेतकऱ्याला केवळ उपाधी नको, तर शाश्वत शेतीची हमी हवी.
पिकविमा योजना खरंच कार्यरत आहे का? २०२३ मध्ये ७०% शेतकऱ्यांना विम्याचा लाभच मिळाला नाही, अशी तक्रार आहे.
तंत्रज्ञान – ठिबक सिंचन, बदलते पिकांचे वाण, हवामान अंदाज... गावोगावी खरंच पोचलंय का?
शेतीतला खर्च वसूल होईल अशी धोरणं राज्यकर्त्यांकडे आहेत का?
शेतकऱ्याला बळीराजा ही उपाधी देऊन मोकळे झालोय सारे, त्यांचेही बरोबर आहे...
ओला असो वा कोरडा, बळी तर शेतकऱ्यांचाच जाणार – बळी राजा आहे ना तो..!
पण याद राखा – बळी राजा असाच बळी होत गेला, तर येणाऱ्या पिढ्या काय खाणार याचा विचार आजच्या पिढ्यांनी नाही केला...
तर भविष्य अंधारमय असणार – ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
---
Location: मुंबई, महाराष्ट्र
First Published: August 22, 2025 – 7:48 AM IST
संपादकीय विभाग – दैनिक विशेष