शेतकरी आत्महत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा; नेवासा पोलीस व तहसील प्रशासनाला निवेदन
नेवासा, २२ ऑगस्ट २०२५ – वडुले (ता. नेवासा) येथील युवा शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून व सरकारच्या खोट्या कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ व मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सहभागातून रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी कुकाणा (ता. नेवासा) येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी १७ ऑगस्ट रोजी विषप्राशन केले असून १८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, फायनान्स कंपन्या, पतसंस्था व सावकारांचा तगादा आणि भाजप सरकारच्या खोट्या कर्जमाफीच्या घोषणांनी त्रस्त होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याला सर्वस्वी राज्यातील भाजप सरकार जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कमवणारी व्यक्ती गेल्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे किमान ५० लाखांची तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी भूमिका या निवेदनात मांडण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन त्वरित पूर्ण करावे, तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत खासदार, आमदार व पालकमंत्र्यांनी तत्काळ मदत जाहीर करून ती संबंधित कुटुंबास हस्तांतरित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. महेश पाटील तसेच नेवासा तहसीलदार श्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपट रामभाऊ सरोदे करत असून, त्यांच्यासोबत तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब पंडितराव अल्हाट, तालुका संघटक नितीन गोर्डे, विनोद गोरडे दीपक सरोदे युवा तालुका उपाध्यक्ष आकाश इंगळे युवासचिव, संदीप क्षीरसागर युवा उपाध्यक्ष, जोजेफ आल्हाट सह आदींच्या सह्या आहेत