नेवासे नगरपंचायत प्रभाग रचनेवर ३३ हरकती; नागरिकांचा भूगोलदृष्ट्या सुसंगत रचनेचा आग्रह
नेवासे नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. शेवटच्या दिवशी तब्बल ३३ हरकती दाखल करण्यात आल्या असून, रचनेत शहराच्या भौगोलिक स्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हरकतींत नमूद केल्याप्रमाणे, प्रभाग क्रमांक १, २ आणि ४ मध्ये किरकोळ बदल करण्यात आले असले तरी उर्वरित प्रभागांची रचना विसंगत असून ती समतोल नाही. मतदारसंख्येची मर्यादा १२०० ते १४०० या निकषात बसवली असली, तरी शहरातील रस्ते, गल्ल्या, नाले, रेल्वे रुळ, नद्या, डोंगर आदींचा पुरेसा विचार करण्यात आलेला नाही.
विशेषतः एका कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले जाऊ नयेत, हा महत्वाचा निकषही पाळण्यात आला नसल्याचे हरकतींत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवर मनमानी निर्णय घेण्याचा आरोप देखील केला आहे.
हरकतदारांनी २०१६-१७ मध्ये झालेल्या प्रभाग रचनेचा दाखला देत, ती रचना भूगोलानुसार अधिक सुसंगत होती, असे म्हटले आहे. त्या रचनेनुसार नागरी सुविधा पोहोचवणे सुलभ झाले होते, त्यामुळे तीच रचना कायम ठेवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्याची रचना लागू झाल्यास रस्ते, गटारी, पाणीपुरवठा यांसारख्या नागरी सुविधांचे नियोजन करणे कठीण होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीचा व भौगोलिकदृष्ट्या सुसंगत प्रभाग रचना करण्याची मागणी करण्यात येत आहे.