"पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक?"
"नेवासा नगरपंचायतीकडून पाणीपट्टी संदर्भातील माहितीमध्ये विसंगती."
नेवासा, ४ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) — सन २०२५ मध्ये नेवासा येथील रहिवासी राजश्री राजेंद्र पटारे यांना त्यांच्या घरी असलेल्या दोन्ही नळ कनेक्शनसाठी पाणीपट्टी आली, आणि विशेष म्हणजे दोन्हीही पावतींमध्ये नोंद पाऊण इंची नळ कनेक्शनची होती, जरी त्यापैकी एक कनेक्शन सन २०१८-१९ मध्येच बंद करण्यात आल्याचे नगरपंचायतीच्या नोंदीत स्पष्ट करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर राजश्री पटारे यांनी नगरपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली असून, ऑडिट अहवाल व नोंदवहीतील विसंगतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजश्री पटारे यांच्या निवेदनानुसार, त्यांच्या घरी पूर्वी दोन नळ कनेक्शन होते—एक अर्धा इंची आणि दुसरा पाऊण इंची. सन २०१८-१९ मध्ये पाऊण इंची नळ बंद करण्यात आला असून, याची नोंद नगरपंचायत कार्यालयात झालेली आहे. तथापि, या कनेक्शनबाबतच्या लेखी नोंदीत व अहवालांमध्ये विसंगती आढळून आल्या.
पटारे यांनी २२ मे २०२५ रोजी २०१७-१८ ते २०२५-२६ या कालावधीतील पाणीपट्टीसंबंधीचे ऑडिट अहवाल मागवले होते. त्यावर नगरपंचायतीने ५ जून २०२५ रोजी उत्तर दिले, परंतु त्या उत्तरात २०१८-१९ आणि २०१९-२० चे ऑडिट अहवाल अनुपस्थित होते. शिवाय, २०१७-१८ च्या अहवालात दुसऱ्या नळ कनेक्शनबाबतची ओळ संपूर्ण रिकामे असून, उर्वरित माहिती हस्तलिखित स्वरूपात आढळून आली.
यानंतर १८ जुलै २०२५ रोजी त्यांनी दुसरा अर्ज करून नळ कनेक्शन घेतल्यापासून २०२५ पर्यंतचा संपूर्ण तपशील, तसेच नळपट्टी भरण्याचे पावतीचे प्रत मागितल्या. नगरपंचायतीने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या उत्तरात संगणकावर टाईप केलेली माहिती दिली, मात्र अधिकृत ऑडिट बुकची प्रत न देता, दोन वेगळ्या कालावधीतील दोन कनेक्शनचे तपशील अपूर्ण स्वरूपात दिले गेले.
३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राजश्री पटारे स्वतः नगरपंचायतीत जाऊन ऑडिट रिपोर्ट तपासण्यासाठी गेले असता, २०१८-१९ च्या ऑडिट अहवालात नोंद आढळली की दुसरा नळ कनेक्शन २०१७ पासून बंद करण्यात आला आहे. मात्र, २०१६-१७ चा अहवाल पुन्हा एकदा रिकामा आढळला आणि उर्वरित नोंदी हाताने लिहिल्या असल्याचे स्पष्ट झाले.
या सगळ्या प्रकारामुळे नगरपंचायतीच्या लेखी नोंदी व आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी पारदर्शक व संगणकीकरण आधारित व्यवस्थेची मागणी केली आहे. या प्रकरणात योग्य चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नेवासा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चौकट-
नगरपंचायत ही नागरीकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. सगळे नियम नागरीकांनी पाळायचे आहेत. नगरपंचायतला मात्र काहीच नियमावली लागु नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नगरपंचायत म्हणजे धर्मशाळाच आहे. कामचुकार आणि घोटाळेबाज अधिकाऱ्यांचा भरणा पडुन आहे. वसुली विभागात फार मोठा भ्रष्टाचार आहे. तळेबंद लागत नाही. नोंदवहीत परस्पर फेरफार केली जात आहे. त्र्ययस्थ संस्थेकडुन या कारभाराची चौकशी होणे गरजेचे आहे. -डॉ करणसिंह घुले पाटील समर्पण फाउंडेशन
चौकट-
नगरपंचायत 10 दिवसाला पाणी सोडून वर्षभराची करपट्टी घेते आणि 24 टक्केव्याज घेते व्याज घेतल्याशिवाय उतारे देत नाही हा तर नगरपंचायत मनमानी कारभार आहे हे जर थांबले नाही तर नेवासकर कुठल्याही प्रकारचे कर भरणार नाही. -अंजुम पाटील नेवासा शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी