सीपीएफ कंपनीवर खरवंडी ग्रामपंचायत हद्दीतील कर आकारणीबाबत चौकशीचे आदेश
– खरवंडी प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायत हद्दीतील सीपीएफ कंपनीकडून कर आकारणीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी व अहवाल सादरीकरणाचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, गटविकास अधिकाऱ्यांनी नियम १९६० भाग-२ मधील नियम ९(४) अंतर्गत पडताळणी करून सुधारित आदेश ग्रामपंचायत खरवंडी यांना निर्गमित करावा आणि याबाबतचा सविस्तर अहवाल आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
ही कारवाई माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांच्या पाठपुराव्यानंतर झाली असून, त्यांनी सीपीएफ कंपनीने २०१५ ते २०२२ या कालावधीत लाखो रुपयांचा कर ग्रामपंचायतीकडे भरला असला तरी त्याचा हिशोब ग्रामपंचायतीने दिलेला नाही, अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती. यानंतरच सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीने कर जमा करून तो कोणत्या कामांसाठी खर्च केला, याची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू असून, ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर चौकशी अहवालानंतर यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई केली जाणार याकडे देखील स्थानिक नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.