नेवासा तालुक्यात श्रीकांत बर्वे यांची तालुकाध्यक्षपदी निवड; परीट समाजात आनंदाची लाट
वडाळा (प्रतिनिधी संदीप वारकड) – नेवासा तालुक्यातील परिट (धोबी) समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भाऊ बर्वे यांची महाराष्ट्र परिट (धोबी) मंडळ युवा संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. काल पार पडलेल्या महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना श्रीकांत बर्वे यांनी सांगितले की, "तालुक्यातील परीट समाजातील युवकांचे संघटन करुन त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील बांधवांना मिळवून देण्यासाठीही कटिबद्ध राहणार आहे." ही संधी त्यांनी समाजकार्याची जबाबदारी मानून पदाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला.
याच बैठकीत विलास बोरुडे यांची शहराध्यक्ष तर लंकेश जाधव यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सर्व निवडी युवा जिल्हाध्यक्ष शिवा राजगीरे यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
या प्रसंगी समाजातील जेष्ठ मार्गदर्शक दादासाहेब बर्वे सर, प्रदेश सदस्य आंबादास राऊत, राजेंद्र आघाडे, बाबासाहेब भागवत, महेश गवळी, रविंद्र आघाडे, आदिनाथ बर्वे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने परीट समाज बांधव उपस्थित होते.
श्रीकांत बर्वे यांच्या या निवडीचे नेवासा तालुक्यात सर्वत्र स्वागत व कौतुक होत असून, समाजाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.