प्रवरासंगमजवळ बोलेरोची दुचाकीला धडक – यशनगरचे दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी
प्रवरासंगम (ता. नेवासा) –
प्रवरासंगम परिसरात मंगळवारी, दिनांक 10 जून 2025 रोजी सकाळी 7:10 वाजता भीषण अपघात घडला. यामध्ये यशनगर (ता. गंगाखेड) येथील दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पाच दिवसांनी, दिनांक 15 जून 2025 रोजी या प्रकरणाची तक्रार संबंधितांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मधुसूदन आनंदगीर गिरी (वय 42) व त्यांचा भाऊ वैभव आनंदगीर गिरी हे दोघे मोटारसायकल (MH 20 EA 9427) वरून भेंडा येथे वैद्यकीय उपचारासाठी जात होते. प्रवरासंगमजवळील पंचशील हॉटेल समोर त्यांच्या मोटारसायकलला बोलेरो (MH 16 AT 5768) गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की बोलेरो गाडी रस्तादुभाजकाला धडकून दोन वेळा पलटी झाली व मोटारसायकलला जोरदार धडक देऊन दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मधुसूदन गिरी यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, हात व पाठीला मार लागला आहे. वैभव गिरी यांच्या डोक्याला, पायाला, हाताला व चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी दोघांना रुग्णवाहिकेतून आत्मदीप हॉस्पिटल, नेवासा फाटा येथे दाखल केले. बोलेरोचा चालक मात्र मदत न करता गाडी घटनास्थळीच सोडून फरार झाला.
या घटनेबाबत मधुसूदन गिरी यांनी 15 जून 2025 रोजी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात बोलेरो चालकाविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
---