"गावाच्या सुपुत्रांचा गौरव! वडाळा बहिरोबात संत नागेबाबा मल्टीस्टेटतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा"
वडाळा बहिरोबा (वार्ताहर संदीप वारकड) –
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे आयोजन नागेबाबा मल्टीस्टेटच्या वडाळा शाखेने केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून OCPM स्कूलचे मुख्याध्यापक तुकाराम वारकड, माजी उपसरपंच सचिन मोटे, पत्रकार विठ्ठल उदावंत, सुनिल मोटे, तुकाराम गायकवाड, चंद्रकांत माळवदे, अभिजीत पंतगे, विलास शिंदे, तसेच शाखेचे एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर नांदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात नैतिक वारकड, साईराज गायकवाड, आदित्य भोगे, भारती मोटे, धनश्री माळवदे, आदिती पठारे, श्रावणी मोटे, प्रीती शिंदे, ऋतुजा फाटके, स्नेहल उनावळे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कोमल फाटके हिने गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत मनोगत व्यक्त केले.
या वेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक वारकड सर म्हणाले, "विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर गावाचेही नाव उज्ज्वल करावे. हीच खरी शिक्षणाची फलश्रुती आहे." त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाखाधिकारी जीवन आगळे सर यांनी नागेबाबा परिवारातर्फे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये गणेश कोकाटे, तुषार जावळे, सोमनाथ घुले, सायली गाडिलकर, पंतगे सर आदींचा मोलाचा सहभाग होता.
एकंदरीत, वडाळा बहिरोबामधील संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेने ज्ञानवंतांचा गौरव करून गावातील नव्या पिढीला प्रेरणेचा नवा मंत्र दिला आहे!