चार दिवसांत खुनाचा छडा: शेवगाव पोलिसांचा झडप घालणारा तपास
प्रतिनिधी | शेवगाव | २४ जून २०२५
बोधेगाव (ता. शेवगाव) येथे हॉटेल राका समोर २० जून रोजी सकाळी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलीस तपासात मृत व्यक्तीची ओळख कैलास काकासाहेब काकडे (वय ४२, रा. हातगाव) अशी पटली. मृताच्या पाठीवर आणि डोक्यावर गंभीर मारहाणीचे घाव असल्याने खुनाची शक्यता लक्षात घेऊन शेवगाव पोलीसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या चार दिवसांत आरोपीला अटक केली.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. बोधेगाव, कांबी, बालमटाकळी व हातगाव परिसरात तपासाचे जाळे पसरवण्यात आले. गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित सिद्धांत मंगेश गवारे (वय २३, रा. बोधेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात समोर आले की, मयत कैलास काकडे याला दारूचे व्यसन होते आणि त्याच्याकडे काही लोकांचे पैसे बाकी होते. यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी अर्धा एकर शेती विकली होती. दि. १९ जून रोजी पत्नीबरोबर बोधेगाव येथे आल्यावर तो 'बाथरूमला जातो' असे सांगून गेला आणि परत आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोसई प्रविण महाले, बाजीराव सानप, पोहेकॉ किशोर काळे, चंद्रकांत कुसारे, परशुराम नाकाडे, तसेच सायबर सेलचे कर्मचारी यांचा समावेश होता.
शेवगाव पोलिसांचा हा वेगवान आणि अचूक तपास स्थानिक नागरिकांत कौतुकाचा विषय ठरला आहे.