नेवासा तालुक्यात सौर पंप योजनेचा फज्जा!
निपाणी निमगाव, उस्थळ, माळीचिंचोरा, बाबुळवेढा गावांतील शेतकरी त्रस्त; पाणीटंचाईमुळे डोक्याला ताप
नेवासा | प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सौर पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात बसवण्यात आलेले सौर पंप आता शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप ठरत आहेत. नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव, उस्थळ, माळीचिंचोरा, बाबुळवेढा या गावांत शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. सौर पंप बसवूनही ते चालू होत नाहीत, परिणामी शेतकऱ्यांना ना पिण्यासाठी पाणी मिळतंय, ना शेतीसाठी!
काही शेतकऱ्यांना वायरच कमी दिली गेली आहे, तर काहींच्या पंपसाठी आवश्यक साहित्यच दिलं नाही. हे सौर ऊर्जा पंप सहज कंपनी ने दिले आहे, जी उपकरणं मिळाली ती देखील निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे. शासनाने जाहिरातबाजी करत ही योजना राबवली असली तरी, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना फसवले जात आहे, असा संतप्त सूर शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी आपले कर्ज काढून व सहकारी संस्थांची मदत घेऊन या योजनेंतर्गत पैसे भरले, पण आज त्यांच्याच शेतात पाणी नाही! सौर पंप लावून ठेवले, पण त्यातून एक थेंब पाणीही नाही, ही परिस्थिती विदारक आणि लाजीरवाणी आहे.
"सौर पंपामुळे पाण्याची सोय होईल" या आशेवर उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना गावातील विहिरीवर किंवा सार्वजनिक टाक्यांवर अवलंबून राहावं लागतंय.
या संदर्भात संबंधित यंत्रणेला शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. यामागे दलालांचं रॅकेट असून, या सौर पंप योजनेंतर्गत शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. तसेच सदरील कंपनीचे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या तक्रारीवर लक्ष देत नाही
शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी विठ्ठलराव लंघे शासन आणि जिल्हा प्रशासनाकडे जोरदार मागणी करणार आहे की, या योजनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांचे नेते श्री खंडागळे गुरुजी यांनी केले आहे.अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू शकतात, असा इशाराही दिला जात आहे.