भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर : दक्षिणेला भालसिंग, उत्तरला दिनकर कायम, नगर शहराची निवड प्रलंबित
AhilyaNagar प्रतिनिधी
भाजपने राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. मात्र, अहमदनगर महानगर (शहर) जिल्हाध्यक्षपदाची निवड अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची पुन्हा एकदा निवड झाली असून उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांना कायम ठेवण्यात आले आहे. भालसिंग हे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निकटवर्तीय असून ते यापूर्वीदेखील या पदावर कार्यरत होते. नितीन दिनकर यांच्याकडे विठ्ठलराव लंघे यांची आमदार म्हणून निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
प्रदेश भाजपाने राज्यातील एकूण ५८ जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या असून या निवडी प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी सचिन पारखी, बाबासाहेब वाकळे व बाबासाहेब सानप ही नावे चर्चेत असून २७ एप्रिल रोजी शिर्डी येथे मंत्री जयकुमार रावल, आमदार विक्रम पाचपुते, निरीक्षक लक्ष्मण सावजी आणि बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत इच्छुकांची चाचपणी करण्यात आली होती. त्यानंतर पदाधिकार्यांकडून प्राप्त झालेली शिफारस पत्रे बंद पाकिटात प्रदेश निवडणूक समितीकडे पाठविण्यात आली आहेत.
शहर जिल्हाध्यक्षपदाची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.