माळीचिंचोरा येथे देशभक्तीचा जागर; पहेलगाम हल्ल्यातील नागरिक व ऑपरेशन सिंदूरमधील शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली, तिरंगा रॅलीने गाव दुमदुमले
माळीचिंचोरा प्रतिनिधी.आज माळीचिंचोरा गावामध्ये देशभक्तीचा एक अनोखा भावनिक आविष्कार घडून आला. जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांना ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी माळीचिंचोरा तरुण मंडळ, ग्रामस्थ, आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत उत्स्फूर्तपणे तिरंगा रॅलीचे आयोजन केले. विशेष म्हणजे ही रॅली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रतापभाऊ चिंधे यांच्या नेतृत्वात पार पडली. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील जनसमूह देशप्रेमाने एकवटलेला दिसून आला.
रॅलीची सुरुवात गावातील हनुमान मंदिरापासून झाली. हातात तिरंगा, ओठांवर "भारत माता की जय" आणि "शहीद जवान अमर रहें" यांसारखे देशभक्तीपर घोष, अंगी राष्ट्राभिमानाचा उत्साह — अशा वातावरणात संपूर्ण गावात रॅलीचे स्वागत झाले. गावाच्या प्रमुख रस्त्यांवरून परिक्रमा करत ही रॅली ग्रामपंचायत कार्यालयासमोर आली, जिथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेला ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, सामाजिक संस्था, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी वीर जवानांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तरुण पिढीला देशसेवेची प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले.