इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ वडाळा बहिरोबामध्ये उत्साहात संपन्न
वडाळा बहिरोबा (ता. नगर) – जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा भैरवनाथ, वडाळा बहिरोबा येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपसरपंच मा. श्री. बाबासाहेब सुधाकर मोटे, मा. श्री. सचिन विलासराव मोटे, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिक्षणातील अनुभव कथन करताना शिक्षकांनी घेतलेली मेहनत कधीच विसरणार नसल्याचे सांगितले. "शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता, चांगले नागरिक बनवण्यासाठी देखील मार्गदर्शन केले," असे भावनिक उद्गार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत प्रेरणा देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, "शाळेचा पाया मजबूत असेल तर विद्यार्थ्यांचे आयुष्य निश्चितच यशस्वी होईल."
कार्यक्रमात बोलताना उपसरपंच मा. श्री. बाबासाहेब मोटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन करत म्हटले की, "शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी परीक्षेला वेळेत उपस्थित राहा, उत्कृष्ठ उत्तरपत्रिका लिहा आणि चांगले गुण मिळवून यशस्वी व्हा."
कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक वृंदांनी केले असून, उपस्थित पालकांनी शाळेच्या कार्यपद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भावी वाटचालीबद्दल उत्साह आणि थोडासा भावूकपणा स्पष्टपणे दिसून येत होता.
---