कांदा बियाण्यात फसवणूक : शेतकऱ्याची पंचायत समितीकडे तक्रार
प्रतिनिधी – नेवासा फाटा
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील त्रिंबक नवले या शेतकऱ्याची एका खासगी कंपनीकडून घेतलेल्या कांदा बियाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.
नवले यांनी संबंधित कंपनीकडून सात किलो कांदा बियाणे खरेदी करून साडेतीन एकर क्षेत्रात लागवड केली. परंतु लागवड केलेल्या कांद्यास केवळ दोन ते अडीच महिन्यांत ३० ते ३५ टक्के डेंगळे आले. सर्व प्रकारची खते आणि फवारण्या करूनही कांद्याची फुगवण झाली नाही. विशेष म्हणजे, कांद्याची संपूर्ण पात पिवळी पडली आहे.
लागवडीदरम्यान रोप कमी पडल्याने नवले यांनी त्याच प्लॉटमधील काही वाफ्यांमध्ये दुसऱ्या कंपनीचे बियाणे लावले होते, आणि त्या भागातील कांदा चांगल्या प्रतीचा तयार झाला. त्यामुळे नवले यांनी फसवणूक झाल्याचे नमूद करत पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बियाणे तज्ञांसह शेतावर भेट देऊन पंचनामा केला आहे. त्रिंबक नवले यांनी सांगितले की, “मी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कांदा लागवड करत आहे. याआधी एकरी १५ ते २० टनांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. पण यंदा नवीन बियाणे घेतल्यामुळे एकरी पाच टनदेखील उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कृषी विभागाचा अहवाल आल्यानंतर मी ग्राहक निवारण न्यायालयात दाद मागणार आहे.”
या प्रकरणावर कृषी अधिकारी प्रताप कूपनर म्हणाले, “शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथील फलोत्पादन विभागाचे विशेष तज्ञ आणि मी प्लॉटची पाहणी केली असून लवकरच उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडे अहवाल सादर केला जाईल.”
शेतकऱ्यांशी अशा प्रकारे बियाण्याच्या नावाखाली फसव